नागरिक जीव मुठीत घेऊनच चालवतात दुचाकी
शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून शहरात उड्डाणपूल उभारले गेले. या पूलांवरून आज सर्वाधिक वाहतूक होते. साहजिकच ठराविक कालावाधीनंतर पुलांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहेच, मात्र उड्डाणपुलांच्या देखभाल, दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने पुलांची दुरावस्था झाली आहे. कांचनवाडीकडे जाणारा रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपूलाची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. येथे रोज अपघात होतात. यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
शहरातील कांचनवाडीकडे जाणार्या, स्टेशनसमोरील पुलावर अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपात केल्या जाणार्या डागडुजीमुळे मात्र खड्डयांचा आकार वाढतच आहे. परिणामी याठिकाणी दररोज अपघात होतांना दिसतात.त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. कांचनवाडीकडे जाणारा हा उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. कांचनवाडी, सीएसएमएसएस कॉलेज, एमआयटी कॉलेज, पैठणला हा रस्ता जोडतो.बाहेरुन येणारी अवजड वाहने याच रस्त्यावरुन शहरात येतात. परंतु सध्या या पुलाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. संपूर्ण उड्डाणपुलावर एक एक फुट खोल असे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवतांना वाहनचालक, चारचाकी चालकांना कसरत करावी लागते.पावसामुळे खड्डयांमध्ये पाणी साठत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येणेही शक्य होत नाही.गेली अनेक वर्षे हा उड्डाणपूल संपूर्ण दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.मात्र अजूनही नागरीकांच्या पदरी निराशाच पडत आहे. कोरोनात अडकलेल्या प्रशासनास इतर कोणत्याही समस्या महत्वाच्या वाटत नसल्याने जीव मुठीत घेऊनच वाहन चालवणे हिताचे आहे.